कुंभमेळ्याचं आकाशवाणीवर राज्यस्तरीय कव्हरेज करायचं हा निर्णय झाला आणि तयारीला वेग आला. हातात जेमतेम सहा महिने होते. पूर्वतयारी दोन आघाड्यांवर समांतरपणे करायची होती. एक म्हणजे नाशिक केंद्रावरून विविध कार्यक्रम- उपक्रमांद्वारे वातावरण निर्मिती करणं आणि दुसरं म्हणजे नाशिक -त्र्यंबकेश्वरच्या प्रत्येकी तीन अशा एकूण सहा शाही पर्वण्यांच्या थेट प्रसारणासाठीचं मनुष्यबळ व्यवस्थापन, कार्यक्रम आराखडा तयार करणं यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रमुख यांच्याशी संपर्क वाढवून त्यांच्या नियमित बैठकांना हजर राहणं, आकाशवाणी काय काय करू इच्छिते याचे प्रस्ताव दाखल करून त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर मंजूर करवून घेणं ही महत्त्वाची प्राथमिक कामं होती. शिवाय दोन्ही ठिकाणच्या पुरोहित संघांशी समन्वयातून अनेक गोष्टी साध्य होतील असा अंदाज आला.
नाशिक मधील पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल हे होते. त्यांना भेटलो. त्यांच्याकडून नाशिक च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची परंपरा, वैशिष्ट्यं जाणून घेतली. शेवटची पर्वणी पार पडेपर्यंत आकाशवाणीला तुमचं आणि पुरोहित संघाचं सहकार्य असू द्या अशी विनंती केली. त्यांनी तात्काळ दिलेला होकार शेवटपर्यंत तंतोतंत पाळला. त्यांनी नाशिक पंचवटीतील अनेक विद्वान पुरोहितांची मला वैयक्तिक ओळख करून दिली. त्यात घनपाठी होते, संस्कृत पंडित होते, कर्मठ याज्ञिकी होते आणि वेदशास्त्राचे तरुण अभ्यासकही होते .
सतीश शुक्ल, शांताराम भानोसे इत्यादींच्या सहकार्याने तेव्हा सिंहस्थातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या भाषणमालिका, मुलाखती, फीचर्स आदींचं नियोजन आम्ही केलं. त्यांचं रेकॉर्डिंगही सुरू केलं. संस्कृत सुभाषितमाला, स्तोत्र, मंत्रं यांचं रेकॉर्डिंग केलं. वेगवेगळ्या आरत्या त्या त्या मंदिरांमध्ये जाऊन प्रत्यक्ष रेकॉर्ड केल्या. मुंबई, पुणे, रत्नागिरी, सांगली, नागपूर, जळगाव, औरंगाबाद इत्यादी केंद्रांवरून उत्तमोत्तम कीर्तनं मागवली. नाशिक केंद्राच्या कार्यक्रमांचा दिवसभराचा आराखडाच बदलून टाकला. कुंभमेळा डोळ्यांसमोर ठेवूनच ही आखणी केली. प्रसिद्ध लेखक डॉ. यशवंत पाठक हे तेव्हा मनमाड कॉलेजला प्राध्यापक होते. त्यांच्याकडून राज्यस्तरीय प्रसारणासाठी रूपकांच्या तीन उत्तम संहिता लिहून घेतल्या. त्यांच्याशी जळगावपासूनचा ऋणानुबंध होता. ते मैत्र यानिमित्ताने वाढलं.
शासकीय- प्रशासकीय कामांची तयारी या दृष्टीने संबंधित विविध खात्यांचे प्रमुख यांच्या मुलाखती, निवेदनं यासाठी प्रसारणात टाइम स्लॉट निश्चित केले. श्रीयुत महेश झगडे हे त्यावेळी नाशिकला जिल्हाधिकारी होते. अतिशय शिस्तप्रिय, उत्साही आणि मृदू स्वभावाच्या झगडे साहेबांशी या पूर्वतयारीच्या प्रसारणानिमित्ताने चांगली ओळख झाली. पुढे कुंभमेळा पार पडेपर्यंत या स्नेहपूर्ण संबंधांचा खूप उपयोग झाला. राज्य शासनाच्या जिल्हा माहिती कार्यालयाची या संपूर्ण काळात शासन आणि माध्यमांच्या समन्वयाची मोठी जबाबदारी होती. त्यावेळी नाशिकला माहिती उपसंचालक श्रीयुत महंत हे होते. कामं वाढायला लागली, तारखा जवळ यायला लागल्या तसे मग शिवाजीराव मानकर आणि इतरही अनेक माहिती अधिकारी नाशिकला दाखल झाले.
आमच्या नाशिक केंद्रात त्यावेळी मर्यादित स्टाफ होता. मी रुजू झालो त्यावेळी उत्तम कोळगावकर संचालक होते. सविता जोशी या स्टेनोग्राफर होत्या. कमलेश पाठक या कार्यक्रम अधिकारी होत्या. मूळ शेती कार्यक्रमांसाठी नियुक्ती असलेले पण इतर भरपूर भार हसतमुखाने उचलणारे प्रसारण अधिकारी संतोष जाधव होते. प्रसारण अधिकारी जयंत कुलकर्णी होते. श्रोताप्रिय निवेदक संजय भुजबळ होते. मी रुजू झाल्यानंतर काही काळातच मुंबईहून कीर्तिदा महेता, पुण्याहून मोहिनी पंडित यांची बदली नाशिकला झाली. त्या दोघीही रुजू झाल्या. संजय भुजबळ यांनी पुण्याला बदली मागितली होती ; त्यांना मिळाली आणि त्यांच्या जागी सोलापूरहून ह्रषिकेश अयाचित यांची बदली झाली. सहायक अभियंता बनसोडे यांच्यासह अभियांत्रिकीचा सर्व स्टाफ होता. लेखा प्रशासन विभागात भाऊसाहेब पगारे हे अभ्यासू आणि कुशल लेखापाल होते.
मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्याचं महत्त्वाकांक्षी आयोजन लक्षात घेता आम्हाला अधिक मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार होतं. त्याच्याही नियोजनाचा विचार दीक्षित साहेबांनी आणि मुंबई केंद्राने केला होता. महाराष्ट्रातील अनेक केंद्रांमधील निवडक कार्यक्रमाधिकारी, प्रसारण अधिकारी, निवेदक यांची कागदावर एक टीम तयार करण्याचं काम सुरू झालं. आमच्या प्रसारणाने वातावरण निर्मिती अप्रतिम होत होती. नाशिककर श्रोत्यांना आकाशवाणीचं हे रूप नवं होतं. आवडायला लागलं होतं. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरची सिंहस्थ नगरी गजबजू लागली होती. पंचवटी आणि कुशावर्त सजू लागलं होतं.
साधू- महंतांचे वेगवेगळे आखाडे डेरेदाखल होऊ लागले होते. ऑफिसमधलं कामांचं नियोजन आणि पंचवटी – त्र्यंबकेश्वरचे फेरफटके यामुळे प्रत्यक्ष कुंभमेळ्याच्या दोन महिने आधीपासूनच मी रोजच बारा ते चौदा तास व्यस्त असायचो. आमचा चैतन्य त्यावेळी आठवीत होता. नाशिकला येऊन सहाच महिने झाले होते, त्यामुळे सौ. स्नेहाच्या नाशिकमध्ये फारशा ओळखी नव्हत्या. कुंभमेळ्याच्या निमित्ताने झालेल्या दौर्यात दीक्षित साहेब आणि मेधा कुलकर्णी यांचं दोनतीनदा घरी येणं झालं होतं. आमच्या कुटुंबाशी घट्ट नातं जोडलं गेलं होतं. त्यांच्याशी होणाऱ्या चर्चांमधून या कामाचा प्रचंड व्याप स्नेहाच्या लक्षात आला. आता तीन-चार महिने तरी “नवरा म्हणू नये आपला” ही समंजस भूमिका घेऊन तिने घराच्या सगळ्या आघाड्या स्वतः सांभाळल्या. स्नेहाचं स्नेहपूर्ण , समर्पित पाठबळ आणि आमच्या दोघांच्याही स्वागतशील समानधर्मी स्वभावामुळे सिंहस्थ कुंभमेळा आमच्यासाठी आनंदपर्वणी ठरणार याची ही नांदीच होती..!