……त्या दिवशी मी घरी परत आल्यावर माझ्या डोक्यात अनेक विचार घोळत होते, मुलाला जेल मधून सोडवण्यासाठी घर विकाव लागल म्हणजे नक्की झालं तरी काय असेल ? त्यांना तोटा झाला असेल का ? तोटा नक्की कोणत्या शेयर्स मध्ये झाला असेल ? मुलाने लोकांचे पैसे घेतले होते त्यांनी केस केली असेल का ? त्या मुलाच्या आईला बाकी लोकांचे पैसे भरून सोडवायला सांगितलं असेल का ? त्या मुलाच्या सीएचे आता काय होईल ? त्या आईची नोकरी राहिली असेल का ? प्रश्नांना अंत नव्हता.
असंख्य विचार माझ्या मनात यायला लागले, खरं सांगायचं तर थोडी धाकधूक पण वाटायला लागली कारण मनातल्या मनात मी त्यांना खूप मानायला लागलेलो, त्यांची कीर्तीचा अशी पसरलेली कि ज्या शेयर्स मध्ये हे माय लेक हात घालत तिथे पैसे कमवत असत, या माय लेकानी केलेली प्रगती पाहून मी पण शेयर ट्रेडिंग अकाऊंट चालू केलेलं, फार काही नाही पण दर महिन्याला एखाद दोन हिंदुस्थान लिव्हर, बजाज ऑटो, इन्फोसिसचे शेयर्स घेण्यासाठी.
मला रोज साईट व्हिसीट्सला जायला लागायचं,त्यामुळे मला खूप काही वेळ शेयर्स मध्ये ट्रेडिंग करायला मिळायचा नाही पण मी पैसे साठले कि शेयर्स घ्यायला लागलेलो.
एक दिवस मला एक ओळखीतून एक कॉल आला, एका गुजराथी परिवाराचे सिंध सोसायटी मध्ये काही इलेक्ट्रिक संदर्भातले काम होते, मी पाहणी करून काय मटेरियल लागेल याची यादी दिली त्यात फिनोलेक्सच्या काही वायर्स लागतील असं मी नमूद केलेलं, ते वाचल्यावर त्या गृहस्थाने फोन उचलून थेट कोणाशी तरी संवाद चालू केला, छाब्रिया, मेरे घर के लिये ये मटेरियल भेज दो, मी दोन मिनिटं स्तब्ध झालो, एवढ्याश्या मटेरियल साठी फीनोलेक्सच्या मालकाशी बोलणारा हा कोण असामी आहे ? मला कुतूहल वाटलं. हा माणूस मुळात पुण्यातला नव्हता त्यामुळे माझाकडे त्याचं इलेक्ट्रिक काँट्रॅक्टींग असलं तरी माझी आणि त्याची भेट अशी वरचेवर होत नसे, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरच आयुष्य तसं खूप रुक्ष असतं असा एक समाज आपल्या समाजात आहे, कदाचित ते खर देखील असेल पण याच धंद्या मुळे मला नानाविध लोक भेटत गेली आणि अपारंपरिक गुंतवणुकीचे धडे मला त्यातून मिळत गेले.
घरातले इलेक्ट्रिक संदर्भातले काम संपल्यावर त्याने मला पैसे घेण्यासाठी मुंबईला बोलावलं, माझ्या समोर काही फारसे पर्याय नव्हते, मी आपले डेक्कन क्वीनचे तिकीट काढून दुसऱ्या दिवशी मुंबईला गेलो तर भाऊ मला म्हणाला आता आलाच आहेस तर जेवूनच जा, मी तरी कशाला नाही म्हणतो मला पण कुठे तरी हॉटेल मध्ये जेवावं लागणारच होते.
तुम शेयर्स में ट्रेड करते हो क्या ?
आम्ही जेवायला बसल्यावर समोरून पहिला प्रश्न आला.
मी म्हणालो छोटा मोटा.
त्या दिवशी त्याने मला जेवताना शेयर बाजाराचे कटू सत्य सांगितले, तो म्हणाला ९५% सामान्य गुंतवणूकदार हे बाजारात पैसे घालवतात, ते कायम तोट्यातच राहतात आणि फक्त ५% लोक पैसे कमावतात.
लोकांना ट्रेडिंगची भुरळ पडते, काही जण दे
ट्रेडिंग करतात काही जण फुचर्स आणि ऑप्शन्स घेतात. तुला सांगतो मोघे, माझी १०० कोटीची तरी बाजारातली गुंतवणूक असेल पण जेव्हा आमचे गुजराथी भाई बंधू येऊन सांगतात ना कि दे ट्रेडिंग मध्ये एवढे पैसे कमावले आणि टेकनिकल ऍनालिसिसचे ९५% कॉल्स बरोबर असतात तेव्हा मला त्यांची कीव येते रे.
दे ट्रेडिंग मध्ये काही क्षणात तुमची गुंतवणूक दुप्पट देखील होऊ शकते, पण मित्रा या स्पर्धेत कोणीच जिंकत नाही, ट्रेडिंग मधून पैसे कमवून कोणीच बाहेर पडलं नाही आहे, शेयर हे एखाद्या चांगल्या व्यवसायात मालकी हक्क निर्माण करायचे साधन असते, लोकांनी त्याचा जुगार करून टाकला आहे.
करायचीच असेल तर गुंतवणूक कर, हवं तर मी तुला मार्गदर्शन करेन. मला साधारण अंदाज आलेला कि हा कोणी तरी मोठा माणूस दिसतो आहे, शेयर बाजारात याची बरीच मोठी पोझिशन आहे हे मात्र त्यादिवशी जेवताना कळलं. मी उगाच नाव सांगायचं भानगडीत पडत नाही कारण नाव आणि आडनावातून अनेक संदर्भ निर्माण होत जातात, पण त्या दिवशी मला मिळालेला गुरुमंत्र माझा मनावर बिंबवला गेला तो कायमचा.
गुंतवणूकदार हा व्यवसायात गुंतवणूक करतो, त्या कंपनीच्या मागील लोकात गुंतवणूक करतो