fbpx

पत मानांकन म्हणजे काय?

सध्या वाढत्या महागाईमुळे खर्च एवढे वाढले आहेत की घर, गाडी किंवा उच्च शिक्षण घेयचा असेल तर कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. कर्ज देणाऱ्या कोणत्याही संस्था जसे की बँक, किंवा इतर वित्तीय संस्था कर्जदाराच्या परतफेडीची क्षमता तपासण्यासाठी क्रेडिट स्कोर म्हणजेच पत मानांकन तपासतात. या मानांकनावरून तुम्हाला किती कर्ज द्यायचं हे ठरवले जाते. थोडक्यात कर्ज घेण्यासाठी तुमची पात्रता ठरवण्यात पत मानांकन मोठी भूमिका बजावतो.

 

भारतातील मोठया आणि मानांकित क्रेडिट ब्युरोमध्ये सिबिल (CIBIL), एक्विफॅक्स (Equifax) यांचा समावेश होतो. CIBIL चा  फूल फॉर्म क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड आहे. क्रेडिट स्कोरला सिबिल स्कोर असे देखील म्हटले जाते. CIBIL स्कोअर व्यक्तीच्या क्रेडिट रेकॉर्डच्या अहवालाच्या आधारे तयार केला जातो. क्रेडिट स्कोअर ठरवताना तुम्ही आतापर्यंत किती कर्ज घेतले आहे, ते वेळेवर फेडले आहे की नाही, कोणत्या बँक किंवा इतर कर्ज देणार्‍या कंपन्यांकडून कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेतले अश्या कर्जाशी संबंधित सर्व गोष्टींचा विचार केला जातो. तुमचा क्रेडिट स्कोअर जितका जास्त असेल तितके सहजपणे तुम्हाला कर्ज मिळते. क्रेडिट स्कोअर चांगला असेल तेव्हा कमी व्याजदरात देखील सूट मिळू शकते. आणि त्यामुळे दीर्घकालीन पैसे वाचू शकतात.

 

क्रेडिट स्कोअरची रेंज ३०० ते  ९०० दरम्यान आहे. जास्त स्कोअर अधिक चांगले क्रेडिट रेटिंग दर्शविते आणि कमी स्कोअर कमकुवत क्रेडिट रेटिंग दर्शविते. म्हणजेच जास्त स्कोअर असलेल्या व्यक्तीची कर्ज परतफेडीची क्षमता चांगली आहे असे समजले जाते आणि काम स्कोअर असलेल्या व्यक्तीला कर्जाची परतफेड करण्यासाठी असमर्थ थेरू शकतो किंवा त्याला परतफेडीसाठी जास्त वेळ लागू शकतो. सामान्यपणे, ७५० पेक्षा जास्त स्कोअर असलेल्या व्यक्ती कर्जदारांकडून कर्ज आणि इतर प्रकारचे क्रेडिट देण्यास योग्य मानली जाते. फक्त प्रत्येक संस्थेचे अशी निर्धोकता निर्धारित करण्यासाठीचे निकष मात्र वेगवेगळे  असू शकतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या क्रेडिटसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक कर्जदाराची नक्की काय मागणी आहे हे बघणे आवश्यक आहे.

 

पण साधारणतः क्रेडिट स्कोअर कसा मोजला जातो ते आपण बघूया:

क्रेडिट स्कोअर मोजताना खालील गोष्टी बघितल्या जातात.

 

परतफेडीचा इतिहास (३५%)

देय रक्कम (३०%)

क्रेडिट इतिहासाची लांबी (१५%)

क्रेडिटचे प्रकार (१०%)

नवीन क्रेडिट (१०%)

 

परतफेडीचा इतिहास: तुमचा परतफेडीचा इतिहास तुमच्याबद्दल बरच काही सांगून जातो. यामध्ये अशी घेतलेल्या कर्जाची परतफेड तुम्ही वेळेवर केली आहे की नाही याचा समावेश होतो. कारण एकदा अशी फसवणूक झाली असेल तर पुन्हा फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. याचबरोबर निर्धारित तारखेपेक्षा  तुम्ही किती वेळा उशीरा पेमेंट झाले आणि किती उशीर झाला हे देखील विचारात घेतले जाते.

 

थकीत रक्कम: देय रक्कम ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या क्रेडिटच्या तुलनेत तुम्ही वापरलेल्या क्रेडिटची टक्केवारी आहे, ज्याला वापरलेले क्रेडिट (Used Credit) म्हणून ओळखले जाते.

 

क्रेडिट इतिहासाची लांबी: दीर्घ क्रेडिट इतिहास कमी धोकादायक मानला जातो, कारण पेमेंट इतिहास निर्धारित करण्यासाठी अधिक डेटा असतो.

 

क्रेडिट मिक्स: विविध प्रकारचे कर्ज प्रकार असल्यास कर्जदार अनेक प्रकारचे कर्ज चुकविण्यास समर्थ आहे असे निर्देशित होते. यात गृह कर्ज किंवा क्रेडिट कार्ड यांचा समावेश असू शकतो.

 

नवीन क्रेडिट: जर का नवीन कर्ज घेण्यासाठी कर्जदारांनी भरपूर अर्ज दाखल केले असतील तर ते धोक्याचे चिन्ह ठरते. कारण असे प्रकार तुम्ही कर्ज घेण्यास खूपच उतावीळ आहात असे दर्शवतात.

 

तुमचा क्रेडिट स्कोअर कसा सुधारावा?

क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी तुम्ही खालील गोष्टींकडे लक्ष देऊ शकता.

 

वेळेवर देयके भरा

सर्व लोन आणि क्रेडिट कार्ड देयके वेळेवर भरणे महत्त्वाचे आहे. विलंबित देयकांमुळे क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. आणि त्यामुळे भविष्यात कर्ज किंवा इतर प्रकारच्या क्रेडिट मिळविण्यास त्रास पडू शकतो.

 

क्रेडिट वापर कमी करणे

कर्जाची जास्त रक्कम देखील क्रेडिट स्कोअरला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे  क्रेडिट वापर कमी ठेवणे हे क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे.

 

क्रेडिट कार्ड खाते बंद करू नका

तुम्ही विशिष्ट क्रेडिट कार्ड वापरत नसल्यास, खाते बंद करण्याऐवजी ते वापरणे बंद करा. कार्डचे लिमिट आणि क्रेडिट मर्यादा लक्षात घेता अचानक खाते बंद केल्यास क्रेडिट स्कोअरला हानी पोहोचू शकते.

 

नियमितपणे तुमच्या स्कोअरवर देखरेख ठेवा

नियमितपणे क्रेडिट स्कोअरवर देखरेख ठेवल्याने तुमच्या स्कोअरवर परिणाम होणार्या कोणत्याही त्रुटी किंवा विसंगती ओळखण्यास मदत होऊ शकते.

 

तुमच्या क्रेडिट अहवालातील कोणत्याही त्रुटी दुरुस्त करा:

तुम्हाला प्रत्येक मुख्य क्रेडिट ब्युरोकडून दर वर्षी एक विनामूल्य क्रेडिट अहवाल मिळण्याचा अधिकार आहे. ते बघून जर का त्यात काही चुकीची माहिती दिसत असेल किंवा काही त्रुटी आढळून आल्यास त्वरित ब्यूरोशी संपर्क साधा आणि योग्य ते बदल अहवालामध्ये करून घ्या.

 

थोडक्यात म्हणजे  पत मानांकन हा एक नंबर आहे ज्याचा तुमच्या आर्थिक स्पेक्ट्रमवर मोठा परिणाम होऊ शकतो. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास, तुम्हाला आरामात कर्ज मिळु शकते (इतर काही गोष्टी लक्षात घेऊन). तुमचा क्रेडिट स्कोअर काय आहे आणि तुमच्या क्रेडिट स्कोअर मोजताना कोणत्या निकषांचा आधार घेतला जातो हे समजल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी तुम्ही नक्कीच पावले उचलू शकता.

ऋता कुलकर्णी
ऋता कुलकर्णी
ऋता ही कायदेतज्ज्ञ असून तिने आर्थिक व्यवहारांचे ज्ञान सुलभ होऊन ते सामान्य मराठी माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून अर्थसाक्षरता नावाचा उपक्रम चालू केला आहे.

वाचनीय असे काही

error: Content is protected !!