fbpx

शब्दांच्या मागचे शब्द -१३: खोगीरभरती

या सदरात शब्दांचा उगम, व्युत्पत्ति, शब्दार्थ तसेच व्याकरणाच्या दृष्टीने त्या शब्दांचा केलेला ऊहापोह  जाणून घेता येईल 

खोगीरभरती/ खोगीर लादणे

खोगीर म्हणजे घोड्याच्या पाठीवरील बैठक, आसन. आत चिंध्या वगैरे निरुपयोगी पण मऊ वस्तू भरून खोगीर केलेला असतो. त्यावरून वास्तविक उपयोग नसताना केवळ संख्या फुगविण्यासाठी घेतलेले (माणसे, वस्तू इत्यादी) असा अर्थ. कुचकामी, निरुपयोगी माणसांचा, वस्तूंचा भरणा. खोगीरभरती / खोगीर लादणे म्हणजे ताबा घेणे, वर्चस्व गाजवणे.

(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश – कृ पां कुलकर्णी आणि विस्तारित शब्द-रत्नाकर- वा. गो. आपटे)

दक्षिणा

संस्कृत धातू ‘दक्ष’ म्हणजे समर्थ असणे, लक्ष देणे. यावरून दक्षिण हात म्हणजेच समर्थ असलेला हात म्हणजे उजवा हात आणि उजव्या हाताने द्यावयाचे दान ते “दक्षिणा”. ऋग्वेदामध्ये ह्या शब्दाला निरनिराळे तात्विक अर्थ होते. आत्मिक सामर्थ्य, सर्जन सामर्थ्य वाढविण्यासाठी जी देवाणघेवाण करत ती या दक्षिणेच्या द्वारे करत असत. यावरून दक्षिणा म्हणजे ब्राह्मणास द्यावयाचे दान असा अर्थ रूढ झाला.

(संदर्भ: मराठी व्युत्पत्ति कोश- कृ पां कुलकर्णी)

ऐन

ऐन हा मूळ अरबी शब्द आणि मूळ अर्थ बहुमूल्य (जिंदगी). नंतर , त्याचा अर्थ प्रथम वसाहतीच्या वेळी ठरवलेला सरकारी सारा.अशा अर्थाने दक्षिणेतील मुलकी खात्यात हा शब्द रूढ झाला आणि त्यावरून पुढे ‘बहुमूल्य मालमत्ता’ असाही एक अर्थ झाला.

उर्दूमध्ये ऐन या शब्दाचे अनेक अर्थ दिले आहेत. १. नेत्र, डोळा, दृष्टी २. जारा, लहान नदी ३. बरोबर, अगदी योग्य ४. सरळ, थेट ५. सख्खा (भाऊ वगैरे). यातल्या नेमक्या अर्थछटा संदर्भानुसार घ्याव्या लागतात.

मराठीत हा शब्द मूळ, मूळचा, भर, भांडवल अशा अर्थाने रूढ झाला.
उदा.
ऐन दुपारी – भर दुपारी,
ऐन किंमत- मूळ किंमत,
ऐन खर्च – मुख्य खर्च,
ऐन जिन्नस – भरपूर किमतीचा माल,
ऐन जमा- मुख्य उत्पन्न,
ऐनवाक – पेरणीची वेळ

(मराठी व्युत्पत्ति कोश – कृ पां कुलकर्णी आणि विस्तारित शब्दरत्नाकर- वा गो आपटे)

लेखन आणि संकलन -नेहा लिमये

नेहा लिमये
नेहा लिमये
मराठी भाषेच्या अभ्यासक. डिजिटल मीडियासाठी लघुकथा, लेख आणि ललितलेखन तसेच मराठीतून कायदेविषयक माहिती देणारे लेखन.#मराठीभाषा उपक्रमाला २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचा उत्कृष्ट डिजिटल कंटेंटसाठीचा सन्मान प्राप्त. व्यवसायाने कंपनी सेक्रेटरी. गेले १५ वर्षे कंपनी कायदा, सेबी रेग्युलेशन संदर्भात सेवा व सल्लागार म्हणून कार्यरत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

वाचनीय असे काही

error: Content is protected !!