fbpx

शब्दांच्या मागचे शब्द: भाग ६-आज, अजून, आणखी

या सदरात शब्दांचा उगम, व्युत्पत्ति, शब्दार्थ तसेच व्याकरणाच्या दृष्टीने त्या शब्दांचा केलेला ऊहापोह  जाणून घेता येईल 

आज, अजून, आणखी

संस्कृतमधील अद्य हा मूळ शब्द. प्राकृतमध्ये याची अज्जु, अज्ज रूपे सिद्ध झाली.जुन्या मराठीत अजीहून, अजू, अजी अशी रूपे वापरलेली आढळतात. यावरून ‘आज’ हा शब्द आला.

उदा. अजी मी ब्रह्म पाहिले, या रचनेत ‘अजी’ म्हणजे ‘आज’.

पुढे ‘अज’ला ‘ इं’ लागून त्याचा अपभ्रंश होऊन ‘अजूइं’ झाले आणि कालांतराने ‘अजून’ हे रूप झाले. (म्हणजेच, ‘अज’ ला ‘ऊन’ प्रत्यय लागून अजून शब्द तयार झालेला नाही. ) हिंदीतील ‘अजहूं’ सुद्धा याचेच रूप.

अजु= आजपासून
अजून/ अजुनी = आत्तापर्यंत, अद्याप

फ़ारसी भाषेत ‘हनूज़’ असा शब्द ‘अद्याप’ या अर्थी वापरला जातो. ‘अजून’ त्याचीच उलटापालट होऊनही आलेला असू शकतो

आणखी या शब्दाचा प्रवास संस्कृत ‘अन्यतक’- प्राकृत ‘अण्णक’ – मराठी ‘आणि’ /’आणिक’ – आणखी असा झालेला आहे.

आणखी/आणिक = अधिक, जास्त

बरेचदा ‘अजून’ हा शब्द ‘आणखी’ सारखाच वापरला जातो. हे टाळले पाहिजे.

उदा. ‘आणखी दे’ ✔️
याऐवजी ‘अजून दे ‘ असे वापरणे.❌

‘गाडी यायला आणखी वेळ लागणार आहे’ ✔️
‘गाडी यायला अजून वेळ लागणार आहे’.❌

परंतु, ‘गाडी अजून आली नाही’ (म्हणजे अद्याप आली नाही) हे बरोबर आहे.

साधारणपणे तीनशे वर्षांपूर्वी जे मराठी लोक महाराष्ट्राच्या बाहेर स्थायिक झालेत त्यांच्या बोलण्यात आणखी हाच शब्द अजूनच्या ऐवजी वापरलेला दिसतो. उदा: अजून मेधा आली नाही? हे वाक्य मध्यप्रदेशातील मराठी लोक आणखी मेधा आली नाही? असे म्हणतात. म्हणजेच हा आणखीच्या ठिकाणी अजून म्हणायचा बदल त्यांच्यापर्यंत पोचला नाही.

 

नेहा लिमये
नेहा लिमये
मराठी भाषेच्या अभ्यासक. डिजिटल मीडियासाठी लघुकथा, लेख आणि ललितलेखन तसेच मराठीतून कायदेविषयक माहिती देणारे लेखन.#मराठीभाषा उपक्रमाला २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचा उत्कृष्ट डिजिटल कंटेंटसाठीचा सन्मान प्राप्त. व्यवसायाने कंपनी सेक्रेटरी. गेले १५ वर्षे कंपनी कायदा, सेबी रेग्युलेशन संदर्भात सेवा व सल्लागार म्हणून कार्यरत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

वाचनीय असे काही

error: Content is protected !!