किमया
छोट्या दोस्तांनो, तुम्हाला हेलन केलर माहितीच असेल. तिला डोळ्यांना दिसत नसे, कानांना ऐकू येत नसे आणि तोंडाने बोलताही येत नसे. एकूणच तिच्या भवितव्याबद्दल तिच्या आई-वडिलांना, शिक्षकांनाही आशा नव्हती. परंतु तिच्या आयुष्यात ऍनी सुलिव्हन ही शिक्षिका आली आणि तिचे आयुष्यच बदलून गेले. या शिक्षकेच्या मार्गदर्शनाखाली हेलनने लेखिका, शिक्षिका होऊन सगळ्यांना चकित केले, शिवाय सामाजिक, राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. म्हणूनच ऍनीला ‘किमयागार’ म्हणजेच जादूगार असं म्हणलं जातं. हेलनसारख्याच इतरांच्या या जादुई वाटणाऱ्या प्रवासावर अच्युत गोडबोले यांचं “किमयागार” हे गाजलेलं पुस्तकही आहे.
किमयागार मधल्या या ‘किमया’ शब्दामागची गंमत सुद्धा हेलनच्या गोष्टीसारखीच वेगळी आहे बरं का ! त्यासाठी आपल्याला इजिप्त देशात जावं लागेल. तर या इजिप्तचं जुनं नाव ‘केमि’ (keme) असं होतं. केमि म्हणजे काळं किंवा करपलेलं. असं सांगतात की इजिप्तमध्ये जी नाईल नदी आहे तिच्या चिखलामुळे तिथला किनारा नेहमी काळा , करपलेला दिसत असे त्यामुळे या देशाला ‘केमि’ असं नाव पडलं. पण ह्या देशातील लोक सोन्याचांदीच्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू असो किंवा आणखी कुठल्या, त्यांचे धातुकाम चांगले करीत. ही धातुकामाची कला इथल्याच लोकांनी सुरु केली म्हणून त्या कामाला ‘किमीच्या कला’ किंवा ‘chemy/ chemia’ म्हणत. हाच chemia शब्द पुढे ग्रीस देशातही गेला आणि तिकडून अरबस्तानात आला ( अरबी भाषेत ‘अल-किमया’). असा मजल दरमजल करत हा शब्द जेव्हा इंग्लिशमध्ये आला तेव्हा chemistry आणि alchemy हे शब्द रूढ झाले. इंग्लिशमधून इतर भाषांमध्ये म्हणजे हिंदी, मराठीत या chemy वरून ‘किमया’ शब्द तयार झाला.
निकृष्ट किंवा हलक्या धातूचे सोने करण्याची विद्या किंवा कला म्हणजे ‘किमया’ म्हणजेच जादुगरी आणि किमयागार म्हणजे किमया/ जादू घडवून आणणारा किंवा जादू करणारा, असे या शब्दांचे अर्थ मराठीत आणि हिंदीत रूढ झाले.
आहे की नाही या शब्दाचा प्रवास गंमतीशीर ? मग आता आई-बाबांना सांगून या सुट्टीत किमयागार पुस्तक नक्की वाचा आणि त्यावर आलेलं नाटक सुद्धा यू -ट्यूबवर बघा ! भेटूया पुढच्या महिन्यात आणखी एक नवीन शब्द घेऊन !
तुमची,
नेहाताई