खर म्हणजे कैलाशला शिक्षणात अज्जीबात रुची नव्हती, नववी नंतर त्याने दहावीची परीक्षा देऊन शिक्षणाला रामराम ठोकलेला पण कैलाश शिक्षणाचे महत्व जाणून होता, त्याने भलेही शिक्षण सोडले असेल पण आपल्या पाठच्या भावाने आणि बहिणीने शिकावे यासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या इराद्याने तो सर्व प्रथम डेटा स्टार इलेक्ट्रॉनिक्स नावाच्या दुकानात काम करत होता. साधारण ८० च्या दशकातल्या घडामोडी होत्या या सगळ्या. कैलाश तेव्हा रेडिओ आणि कॅल्क्युलेटर्स दुरुस्तीच काम करत होता, वयाच्या १९व्या वर्षी त्याच्या दुकान मालकाने त्याला मुंबईला शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवलं, हे दोन महिन्याचं प्रशिक्षण त्याचसाठी खूप महत्वाचा ठरलं. पुढे पाच वर्ष या अनेक इलेक्ट्रॉनिक गोष्टींची दुरुस्ती केल्यावर २४व्या वर्षी कैलाशला पहिल्यांदा असं वाटलं कि आता आपल्याला बदल हवा, आपली झेप मोठी आहे असा त्याला विश्वास वाटू लागला, आता आपण नवीन आवाहने पेलू शकतो, स्वतःच दुकान टाकू शकतो असे विचार त्याच्या मनात घोंगावू लागले.
इतके दिवस नोकरी करून त्याचाकडे साधारण १५००० रुपये गाठीशी जमले होते, त्यातून त्याने एक १०० फुटाच दुकान भाड्याने घेतल, बघता बघता रिपेयरच्या धंद्यातून पोराने त्या काळात ४५००० रुपये कमावले, केवळ १५००० च्या भांडवलावर एका वर्षात पैसे तिप्पट झाले. त्या काळात खरं तर ही रक्कम तशी मोठी होती पण कैलाशची महत्वाकांक्षा त्याहून किती तरी विशाल होती. थोड्याने त्याच समाधान नक्कीच होणार नव्हते. त्या वर्षी पासून त्याने देखभालीसाठीची वार्षिक कंत्राट घ्यायला सुरुवात केली, सगळ्यात पहिले काही धनवान मंडळींच्या घरातली आणि नंतर मोठ्या कंपन्यातील कंत्राट कैलाश घेऊ लागला होता. दिवस व्यवस्थित चालले होते. नफा वाढत होता पण कैलाशची भूक मोठी होती. त्याची नजर नवीन संधीच्या शोधात होती, एक दिवस एका बँकेत कॅल्क्युलेटर आणि लेजर पोस्टिंग मशीन दुरुस्त करण्यासाठी गेला असताना त्याला एक मोठे मशीन दिसले. दिसायला टीवी सारखे वाटत होते. या मशीन बदल थोडी चौकशी केली असता त्याला कळले कि हे मशीन बँकेत येणार असल्यामुळे माणसांच्या नोकऱ्यांवर गदा येणार अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली होती, या मशीनचा विरोधात आंदोलन चालू झालेली होती.
कैलाशला या मशीनबद्दल खूप आकर्षण वाटायला लागलं, याला कम्प्युटर म्हणतात असं कळल्यावर त्याच्याकडे असलेल्या पैशातून त्याने सगळ्यात पहिले बाजारात जाऊन संगणक दुरुस्तीची सगळी पुस्तक आणून वाचून काढली. एक दिवस त्या बँकेचा संगणक बंद पडल्यावर त्याने व्यवस्थापकाला बराच वेळ विनवणी केली कि मी हे मशीन दुरुस्त करून देतो. पहिले त्याचा त्या विनंतीला मान न देणाऱ्या व्यवस्थापकाने एक दिवस त्याला सांगितलं कि दाखव तुझे हुनर आणि कर हे बंद पडलेला मशीन दुरुस्त. कैलाशने ते दुरुस्त केल्यावर मग बँकेतून त्याला नियमितपणे बोलावलं जाऊ लागलं. आणि इथे खरं तर कैलाशचा नशीब पालटलं, संजय हा त्याचा लहान भाऊ, त्याला खर तर इलेकट्रोनिक्स मध्ये रुची होती पण का कोणास ठाऊक कैलाशला संगणक जास्त आश्वासक वाटायला लागलेला, त्याने संजयला नुसता मनवलच नाही तर त्यासाठी लागणार खर्च पण त्याने उचलला आणि संजय मॉडर्न कॉलेजात दाखल झाला. आता नुसत्या दुरुस्तीवर समाधान न मानता त्याने वार्षिक कंत्राट घेण्यास सुरुवात केली, त्याकाळी कम्प्युटर घराघरात दिसायला लागलेला, प्रत्येक संगणकावर असणारी विंडोजची नकली प्रत, लोकांमध्ये असलेली संगणकाबद्दलची अनभिज्ञता, हार्डवेयर बदल वाटणारी एक सुप्त भीती यामुळे कैलाशकडे बऱ्यापैकी मोठी वार्षिक कंत्राट येऊ लागली त्याच्या रिपेयरशॉप मध्ये आता कॅल्क्युलेटरच्या रिपेयर्स सोबत हळूहळू त्याच्याकडे फ्लॉपीड्राइव्स पण यायला सुरुवात झाली.