आख्यान / व्याख्यान/ उपाख्यान
आख्यान म्हणजे वर्णन, वृत्तान्त सांगणे, सूचित करणे. संस्कृत मध्ये पौराणिक कथा सांगताना आख्यान या शब्दाचा वापर होताना दिसतो. आख्यान म्हणजेच अशी पौराणिक कथा ज्यात कथा सांगणारा हा स्वतःच त्या कथेतील एक पात्र असतो किंवा कथा त्या व्यक्तीवर बेतलेली असते. “आख्यायते अनेनेति आख्यानम” म्हणजेच अशी कथा जी कवी/ लेखकच सांगतो आहे, इतर पात्रांकडून ती वदवून घेत नाही. अशा कथांमध्ये एका भागापासून कथा सुरु होऊन, त्याची पूर्वपीठिका उलगडत नेली जाते. यात पात्रांमधील संवाद फार लांबलचक नसतात. शक्यतो भूतकाळाचा वापर करून कथा सांगितली जाते आणि प्रसंगानुरूप वर्तमानकाळाचा वापर केला जातो. वेद -पुराणात आख्यानांचा संग्रह मिळतो. बरेचदा आख्यानांवर आधारीत ग्रंथ रचले जातात आणि त्यातील अध्यायही वेगवेगळ्या आख्यानावरच आधारलेले असतात. या संदर्भात महाभारताचा उल्लेख मिळतो.
आख्यायिका हा शब्द आख्यानावरुनच आला. एखाद्यानं सांगीतलेली कथा दुसर्या कोणी तरी पुढच्याकडे सुपुर्द करत बनलेली आख्यायिका होत
व्याख्यान –
व्याख्या= वि + आ+ ख्या
ख्या म्हणजे सांगणे. वि म्हणजे विशेषत्वाने आणि आ म्हणजे सर्व दिशांनी, सर्वतोपरी, सर्व अंगांनी, सर्व दृष्टींनी. म्हणून व्याख्या शब्दाचा मूळ अर्थ होतो पूर्ण स्पष्टीकरण
व्याख्याता ही उपाधी देखील व्याख्यानाशी संलग्न आहे
त्याचप्रमाणे व्याख्यान या शब्दाचा अर्थ टीका करणे , भाषण, वक्तृत्व , एखाद्या विषयांचे समुदायासमोर मौखिक वर्णन करणे असेही दिले आहे.
व्याख्यान हे आख्यानाचे विस्तृत रूप आहे. व्याख्यानामध्ये एखाद्या घटनेचा वृत्तान्त देणे, वर्णन करणे याबरोबरच काही गोष्टींची व्याख्या करणे, त्यावर टीका-टिपण्णी करणे, एखाद्या गोष्टीचे ज्ञान करून देणे हे ही समाविष्ट असते. “वि” हा उपसर्ग अधिकता दाखवतो म्हणून व्याख्यान म्हणजे फक्त कथा किंवा वृत्तान्त सांगणे असे नसून त्या बद्दलची साधक-बाधक चर्चा व मुद्दे म्हणजे व्याख्यान असे अपेक्षित आहे.
आणखी एक गंमत म्हणजे उपाख्या किंवा उपाख्यान हा आणखी एक बोली भाषांमधील प्रकार. म्हणजेच दैनंदिन व्यवहारात नीतिमत्ता किंवा नीतिमूल्ये दर्शविणारी एखादी गोष्ट , कथा, म्हण. यात आख्यानावर आधारीत काही रोचक शब्द-प्रयोग असतात. जसे कीर्तनकार कीर्तन करताना दृष्टांतरूप कथा सांगतात. तर त्या कथा म्हणजे उपाख्यान. याचेच हिंदी रूप “उख्खान” आणि मराठीतील रूप म्हणजे “उखाणा “.